Ad will apear here
Next
फासले ऐसे भी होंगे...


‘तिला साधा सुरी-काटा कसा वापरायचा माहिती नाही...’ इतकं तुझ्यात आणि तिच्यात अंतर आहे. 

‘सर - इज लव्ह इनफ’ या नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं हे वाक्य ऐकून ‘समानता ही संकल्पना मानवाच्या अस्तित्वाइतकी प्राचीन आहे; पण समानता म्हणजे नक्की काय याबाबत स्पष्टता मात्र अभावानंच आढळते’ हे नमित अरोराच्या ‘लॉटरी आॉफ बर्थ’ या पुस्तकामधलं वाक्य आठवलं.  

... मात्र चित्रपट लक्षात राहतो तो वेगळ्याच प्रसंगांमधून.

आपल्या खेड्यातल्या घरातल्या पायरीवर बसलेल्या तिला त्याचा फोन येतो.. काळोखा पण उत्सुक आसमंत... चमचमत्या चांदण्या वगैरे नसल्या तरी मोकळं आकाश - अशा ठिकाणी येऊन ती फोन घेते... ‘फोन का केला’ यावर त्याचं उत्तर असतं... ‘सहज’... 

थोड्याच वेळापूर्वी घडलेल्या एका प्रसंगात तो मित्राला म्हणतो, ‘असं सहज मैत्रिणीला फोन करणं, मेसेजेस पाठवणं यातला मी नाहीये...’

ती खेड्यातून कामावर परत येते... त्याचं लग्न नुकतंच मोडलंय... त्या लग्नातल्या भेटवस्तू त्याच्या घरात कुरिअरनं येऊन पडतात... त्याच्या नजरेला त्या पडून त्याला त्रास होऊ नये म्हणून तिला त्या घाईघाईत लपवून ठेवायच्या असतात...

‘सर’ चित्रपटात ती खेड्यातून शहरात येते आणि तिचं आयुष्य बदलतं. ती करत असलेली नोकरी सोडते आणि तिला हवी असलेली फॅशन डिझायनरची नोकरी मिळते. आपल्या सुरक्षित चौकटी मोडायला आपण घाबरत असतो; पण जरा धाडस दाखवलं तर चांगलं काही तरी घडू शकतं हा आश्वासक संदेश त्यातून मिळतो.

यातली तिलोत्तमा शोमनं रंगवलेली रत्ना स्वाभिमानी आहे. आयुष्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहणं तिला जमलं आहे. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ते तिला ठाऊक आहे. खेड्यातून येऊन मोठं स्वप्न पाहणं, त्यासाठी कष्ट आणि धडपड करणं, आपल्याबरोबर आपल्या बहिणीलाही वर आणण्यासाठी खटपट करणं हे ती सतत करते. आयुष्य थांबत नाही, हे ती आपल्या मालकालाही सांगू शकते. नोकर म्हणून अत्यंत आज्ञाधारक असलेल्या रत्नाला स्वत:चं जग आहे. एरव्ही अत्यंत साधेपणानं आयुष्य जगणारी रत्ना आपल्या मैत्रिणीबरोबर गणपती विसर्जनाच्या वेळी नाचते, बहिणीनं शिक्षण संपवल्याशिवाय लग्न करू नये असा आग्रह धरते. तिथे ती ठाम आहे..



विवेक गोंबरनं रंगवलेला आश्विन मात्र अचानक झालेल्या ब्रेकअपनं गोंधळलाय. काय करावं त्याची दिशा त्याला समोर दिसत नाहीये; पण तो स्वत:शी अत्यंत प्रामाणिक आहे. दुटप्पीपणा त्याच्या स्वभावात नाही. थेटही आहे. त्यामुळेच आधी सतत आपल्या बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये असलेला तो तिच्याशी स्वयंपाकघरात सहज येऊन गप्पाही मारतो.

चित्रपटात संवाद खूप कमी आहेत. शांततेचे सूर मात्र सुरेलपणे ऐकू येत राहतात... जसं एका प्रसंगात सुरेख बासरी ऐकू येते तसंच.

बोलायचं काम कलाकारांच्या अभिनयाबरोबरच कॅमेराही खूप करतो. घरातलं वातावरण जरासं तणावपूर्ण असलं तरी नकारात्मक, घुसमटीचं, श्वास गुदमरावा असं अजिबात नाही, हे सतत जाणवतं. घरातल्या खोल्यांमधल्या भिंती त्या दोघांमधलं सामाजिक अंतर संयतपणे दाखवतात. 

दारं, जिने, आलिशान इमारती, इमारतीबाहेरचं हातात हात असलेलं मोठं शिल्प, लिफ्ट, बाल्कनी, तिथल्या कुंड्या, टेरेस - (तिथल्या मोकळ्या जागेत जरा चौकटीबाहेरचे विचारही मुक्तपणे समोर येतात), समुद्र, गजबजलेले रस्ते, वाहनांची वर्दळ, फुलांचा बाजार, कापड मार्केटमधला काहीसा बकालपणा, रात्र, अंधारात उजळलेले रस्ते, रात्री उजळलेल्या इमारती... असं प्रत्येक दृश्यातून चित्रपट आपल्याशी संवाद साधत राहतो.

चित्रपटाचा शेवट ‘आणि ते सुखानं नांदू लागले’ अशा प्रकारचा अजिबात नाही. उलट ‘पुढे काय?’ याबद्दल तो आपल्याला विचार करायला सोडून देतो. 

‘अपवर्ड मोबिलिटी’ या विषयावर विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो. आपल्याकडच्या चित्रपटांमध्ये ‘बॉबी’पासून नागराजच्या ‘फँड्री’पर्यंत हा विषय अनेकदा येऊन गेलाय. 

इतिहासात डोकावलं तर माणसाचं भवितव्य तो जन्म घेतो त्यावरच ठरत असलेलं मोठ्या प्रमाणात दिसतं. राजाचा मुलगा राजा आणि मजुराचा मुलगा मजूर हा प्रचलित समज होताच. अँटिक्विटीच्या काळात (सहाव्या शतकापर्यंतचा काळ) जातिव्यवस्था साचेबंद होती. तेव्हा सुंदर स्त्रिया, उत्तम अॅथलीट्स, लष्करी चातुर्य असणारे बुद्धिमान, धाडसी सैनिक आणि काही सर्जनशील कलाकार काही वेळा नशिबानं वरच्या वर्गाच्या शिड्या चढू शकायचे. 

उदाहरणार्थ, इजिप्तमधल्या फेरोनं जोसेफ या एका गुलामाला इजिप्तचा वजीर केलं होतं. नेल ग्वेन ही एक सुंदर तरुणी इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सची रखेल होती. तिचा मुलगा १४व्या वर्षी अल्बान्सचा ड्यूक बनला. मध्ययुगात अल्फान्सो बोर्जिया हा एका शेतकऱ्याचा मुलगा १४५५ साली पोप कॅलिक्टस झाला. हे सगळं तुरळक प्रमाणात होतं. या प्रकाराला समाजशास्त्रात अपवर्ड मोबिलिटी म्हटलं जातं. 

साथीचे रोग, युद्ध अशांसारख्या गोष्टींमुळे झालेल्या सामाजिक आणि आर्थिक उलथापालथी सोशल मोबिलिटीकडे (अपवर्ड मोबिलिटी हा सोशल मोबिलिटीचा एक प्रकार आहे.) नेतात, असं समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 



१३०० साली ब्लॅक डेथ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या साथीमुळे लाखो माणसं मरण पावली. गुलामांचा तुटवडा भासायला लागला आणि उरलेले गुलाम/मजूर जास्त वेतनाची मागणी करायला लागले. दुसऱ्या  महायुद्धानंतर बहुतेक देश भकास झाले आणि अमेरिकेत आर्थिक भरभराट झाली. त्याचाच एक भाग म्हणून आज भारतातले अनेक लोक अमेरिकेत समृद्ध आयुष्य जगत असले तरी भारतात ‘अपवर्ड मोबिलिटी हे स्वप्नच आहे का?’ असा प्रश्न ‘सर’ हा चित्रपट नक्कीच उपस्थित करतो. 

लायक लोकांना यश/प्रतिष्ठा/कीर्ती मिळायलाच हवी हे मानसिक पातळीवर आपल्याला पटत असतं; मात्र समाजात वागताना, मनातली गृहीतकं जाता जात नाहीत. ‘सर’ या चित्रपटात आपल्या उंची पोशाखावर घरातल्या मेडच्या हातून चुकून काही तरी सांडल्यावर ‘त्यांच्या पगारातून पैसे कापले म्हणजे ते जागेवर राहतात’ असं अत्यंत तुच्छतेनं म्हणणारी तरुणी दिसते. अर्थात, शेवटी सॉरी म्हणून ती नायिकेला मदतही करते. 

एकूणच, सुरुवात सुखद असलेल्या प्रेमकथेचा शेवटही अत्यंत सुखद असावा हा दुर्मीळ योग ‘सर’ या चित्रपटात जमून आला आहे. 

- नीलांबरी जोशी

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XUZECU
Similar Posts
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट ‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language